गिरगाव मधील एका मल्टिप्लेक्स मधुन सतिश राजवाडे ह्यांचा ’मुंबई-पुणे-मुंबई’ हा मराठी चित्रपट उतरवुन त्याठिकाणी तमीळ चित्रपट लावण्यात आला. ऑस्कर पर्यंत मजल मारणार्या आणि संपुर्णत: कात टाकलेल्या मराठी चित्रपटाला त्यांच्याच राज्यात मल्टिप्लेक्समधे प्राईम टाईमला शो मिळत नाही यासारखे सरकारचे अपयश ते कुठले? "मराठी चित्रपट चालत नाहीत..." असं सारखं टुमकं लावीत हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांना मल्टिप्लेक्सचे मालक प्राधान्य देतात परंतु साधं गणित आहे कि, मराठी चित्रपट पाहणारे लोक हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आहे जो संध्याकाळच्या प्राईमटाईमलाच चित्रपट पाहु शकतो परंतु मराठी चित्रपट हे सकाळी किंवा दुपारी लावले जातात ह्या कारणामुळे त्या चित्रपटांना गर्दि कमी असते. ह्याउलट संद्याकाळच्या प्राईम टाईमला हिंदी चित्रपट दाखवले जातात. वर्षाचे जवळजवळ ९५-९८% हिंदी चित्रपट सपशेल फ़्लॉप होतात हे पण तितकच सत्य. मराठी चित्रपट चालत नाही असं असेल तर भारतमाता चित्रपटगृहातील मराठी शो हे हाऊसफ़ुल कसे होतात? नटरंग, हरीश्चंद्राची फ़ॅक्टरी दिल्लीच्या मल्टिप्लेक्स मधे कसे काय लागतात?. मराठी चित्रपटांमधे गर्दि खेचुन आणण्याची ताकद आहे, जे मागच्या काहि आणि आजचे चित्रपट दाखवुन देत आहेत फ़क्त त्यांना मल्टिप्लेक्समधे संधी मिळत नाही. तीच परिस्थीती आमच्या गावाकडच्या चित्रपट गृहात देखील आहे. आठवड्यातुन एकदा-दोनदा आणि ते पण काहि ठरावीक चित्रपट दाखवले जातात. मग मराठी चित्रपट दाखवण्याच्या आधीच ते ’लोकांना आवडत नाहीत..’ असं म्हणुन त्याचं खापर लोकांवरच फ़ोडण्याचा प्रयत्न करणार्या चित्रपटगृहाच्या मालकांवर महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा. फ़क्त चित्रपटांचे सत्कार करुन त्यांच्या दिग्दर्शकांच्या, निर्मात्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे हा न्याय नाही. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मधे प्राईम टाईमसह जास्तीत जास्त शो मिळावेत.
नव्या मराठी चित्रपटांमधील भुमीका, कला, कथा, दिग्दर्शन, संगीत हे खरोखरच वाखणण्याजोगं.. जे त्यांना एक दिवस ऑस्कर मिळवुन देईल ह्यात थोडिही शंका नाही. परंतु त्यांचं महत्व सर्वात आधी महाराष्ट्रातला रसिकांना कळायला हवं. त्यासाठी हे चित्रपट महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपट गृहामधे लागले पाहिजेत. "मराठी चित्रपट कात टाकत नाही तर त्याने संपुर्ण: कात टाकलेली आहे, तो पुर्णत: बदललाय" हे सत्य मराठी रसिकांनी जाणून घ्यावं आणि मराठी नाटक, चित्रपट आवर्जून पहायला जावं, मराठी संगीत ऐकावं ह्यातचा आपला महाराष्ट्र धर्म जगवला आणि जोपासला जाईल.