शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

गुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात.

गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत आहेत. गुगल डिक्शनरी हि गुगलची सेवा भारतातील व जगातील प्रमुख भाशेंमध्ये उपलब्ध होती.(http://www.google.com/dictionary) त्या द्वारे इंग्रजीतील कुठलाही शब्दाचा अर्थ आपल्याला कुठल्याही भाषेत पाहता येत असे. त्यात मराठीचा देखील समावेश असल्यामुळे इंग्रजीतील शब्दांचा अर्थ मराठीत दिसे..परंतु आता ती सुविधा गुगल ने बंद केली आहे. ह्याचा फटका इतर भाशेंना बसणार नाही कारण त्या भाषेत गुगलने Google Translator हि सुविधा आधीपासूनच कार्यरत केली होती. जी गुगल डिक्शनरी पेक्षा अधिक प्रगत आहे. गुगल आणि फेसबुक देखील मराठी सोडून भारतातील सर्व प्रमुख भाषेत त्यांच्या सुविधा पुरवत आहे. फेसबुक आणि गुगल ने मराठी भाषेवर एकाचढ एक आघात करायचं नव प्रोडक्ट बाजारात नाही आणलं म्हणजे मिळवलं.

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

मराठीची हि माहिती आहे का?

१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळायलाच हवा...


        गिरगाव मधील एका मल्टिप्लेक्स मधुन सतिश राजवाडे ह्यांचा ’मुंबई-पुणे-मुंबई’ हा मराठी चित्रपट उतरवुन त्याठिकाणी तमीळ चित्रपट लावण्यात आला. ऑस्कर पर्यंत मजल मारणार्‍या आणि संपुर्णत: कात टाकलेल्या मराठी चित्रपटाला त्यांच्याच राज्यात मल्टिप्लेक्समधे प्राईम टाईमला शो मिळत नाही यासारखे सरकारचे अपयश ते कुठले? "मराठी चित्रपट चालत नाहीत..." असं सारखं टुमकं लावीत हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांना मल्टिप्लेक्सचे मालक प्राधान्य देतात परंतु साधं गणित आहे कि, मराठी चित्रपट पाहणारे लोक हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आहे जो संध्याकाळच्या प्राईमटाईमलाच चित्रपट पाहु शकतो परंतु मराठी चित्रपट हे सकाळी किंवा दुपारी लावले जातात ह्या कारणामुळे त्या चित्रपटांना गर्दि कमी असते. ह्याउलट संद्याकाळच्या प्राईम टाईमला हिंदी चित्रपट दाखवले जातात. वर्षाचे जवळजवळ ९५-९८% हिंदी चित्रपट सपशेल फ़्लॉप होतात हे पण तितकच सत्य. मराठी चित्रपट चालत नाही असं असेल तर भारतमाता चित्रपटगृहातील मराठी शो हे हाऊसफ़ुल कसे होतात? नटरंग, हरीश्चंद्राची फ़ॅक्टरी दिल्लीच्या मल्टिप्लेक्स मधे कसे काय लागतात?. मराठी चित्रपटांमधे गर्दि खेचुन आणण्याची ताकद आहे, जे मागच्या काहि आणि आजचे चित्रपट दाखवुन देत आहेत फ़क्त त्यांना मल्टिप्लेक्समधे संधी मिळत नाही. तीच परिस्थीती आमच्या गावाकडच्या चित्रपट गृहात देखील आहे. आठवड्यातुन एकदा-दोनदा आणि ते पण काहि ठरावीक चित्रपट दाखवले जातात. मग मराठी चित्रपट दाखवण्याच्या आधीच ते ’लोकांना आवडत नाहीत..’ असं म्हणुन त्याचं खापर लोकांवरच फ़ोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चित्रपटगृहाच्या मालकांवर महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा. फ़क्त चित्रपटांचे सत्कार करुन त्यांच्या दिग्दर्शकांच्या, निर्मात्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे हा न्याय नाही. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मधे प्राईम टाईमसह जास्तीत जास्त शो मिळावेत.
        नव्या मराठी चित्रपटांमधील भुमीका, कला, कथा, दिग्दर्शन, संगीत हे खरोखरच वाखणण्याजोगं.. जे त्यांना एक दिवस ऑस्कर मिळवुन देईल ह्यात थोडिही शंका नाही. परंतु त्यांचं महत्व सर्वात आधी महाराष्ट्रातला रसिकांना कळायला हवं. त्यासाठी हे चित्रपट महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपट गृहामधे लागले पाहिजेत. "मराठी चित्रपट कात टाकत नाही तर त्याने संपुर्ण: कात टाकलेली आहे, तो पुर्णत: बदललाय" हे सत्य मराठी रसिकांनी जाणून घ्यावं आणि मराठी नाटक, चित्रपट आवर्जून पहायला जावं, मराठी संगीत ऐकावं ह्यातचा आपला महाराष्ट्र धर्म जगवला आणि जोपासला जाईल.

शुक्रवार, २ जुलै, २०१०

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर..


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती
अंबर कवेत घेताना
हसू असावे ओठावरती
काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करून जावे बरेच काही
दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या
निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-- गुरु ठाकूर

सोमवार, १५ मार्च, २०१०

जागतिक मराठी भाषा दिन

जागतिक मराठी भाषा दिन म्हणजेच २७ फ़ेब्रुवारी २०१० ह्या दिवशी संगीतकार कौशल इनामदार ह्याने १२२ गायकांना एकत्र करुन हे गीत गाऊन विश्वविक्रम तयार केला आहे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥

येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी