असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती
अंबर कवेत घेताना
हसू असावे ओठावरती
काळीज काढून देताना
संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करून जावे बरेच काही
दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या
निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-- गुरु ठाकूर
3 comments:
Chhan Kavita aahe...
वाह! काय छान लिहीलय....मस्तच एकदम..!
खरच मनापासून आवडली मला कविता...
टिप्पणी पोस्ट करा